Friday, April 30, 2010

महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने...

आज १ मे, २०१०. महाराष्ट्र राज्याचा ५० वा वाढदिवस. मराठी माणसाने केलेल्या "संयुक्त महाराष्ट्र" या चळवळीतून साकार झालेल्या स्वप्नाला ५० वर्षे पूर्ण झाली. आज सगळीकडे हा सोहळा साजरा होताना पाहून मनाला आनंद होतोय. कुणी ओठांवर, कुणी मनात पण प्रत्येक मराठी माणूस हेच म्हणतोय, "मला गर्व आहे, मी महाराष्ट्रीय असल्याचा."

एकीकडे हे चित्र, एकीकडे दुसरंच. भावना जरी सारखी असली, तरी मराठी माणसांमध्ये एकी नाही हे पाहून खूप वाईट वाटते. मराठी मायभूमीची महती सांगण्याकरिता अनेकांनी अनेक कार्यक्रम आखलेत. कुणी गानकोकिळा लता मंगेशकरांना ही "गौरव गाथा" गायला सांगतंय, तर कुणी क्रिकेटचा देव मानला जाणाऱया सचिन तेंडुलकरचा सन्मान करून मायभूमी महाराष्ट्र किती महान आहे, हे पटवून देतंय.

जे लताबाई म्हणत आहेत किंवा जे सचिन तेंडूलकर म्हणतोय, ते अगदी खरंय. महाराष्ट्राच्या मातीत एक वेगळीच जादू आहे, जी तिच्या मुलांना तिने इतकं प्रतिभावंत बनवते की अख्ख्या जगात कुणी त्यांच्याशी स्पर्धा करू शकत नाही. लताबाई, आशा भोसले, सचिन तेंडूलकर, सुनील गावस्कर, प्रतिभा पाटील, दादासाहेब फाळके, आनंदीबाई जोशी, सावित्रीबाई फुले आणि अशी कित्येक नावे आहेत ज्यांनी आपापल्या क्षेत्रात इतकी मोठी झेप घेतली की त्या ठिकाणी पोहोचण्याचा दुसरं कुणी विचारही करू शकत नाही. मग त्या उच्चांकावर पोहोचल्यावर कुणी त्यांना हे विचारत नाही, ते मराठी आहेत का कानडी. ते अख्ख्या देशाचे. एक उदाहरण, माणसाच्या प्रतिभाशक्तींचं!

मग महाराष्ट्राल्या मराठी माणसाला मराठी असल्याची लाज का वाटावी? कुठल्या तरी "सेने"ने त्याच्या मराठीपणाची गर्वाची भावना त्याच्यात जागृत करायची वेळ का यावी? त्याच्याच महाराष्ट्र देशात त्याला स्वतःचं अस्तित्व स्थापन करायची वेळ का यावी?

एकीकडे हे चित्र. दुसरीकडे दुसरं. स्वतंत्र विदर्भाची मागणी करणारं. तिथल्या मराठी माणसाला वाटतं, महाराष्ट्रात त्याला काडीची किंमत मिळत नाही. म्हणून त्याने महाराष्ट्र दिनाचं निमित्त साधून त्याच्या चळवळीला अजून मोठं रूप दिलं. त्याच्या उदासीनतेला कारणीभूत कोण? त्याची साथ न देणारं राज्यसरकार? की तो स्वत:? जो मायभूमीचे ऋण फेडण्याऐवजी, तिचा उद्धार करण्याऐवजी स्वत:ची सुखस्वप्ने पूर्ण झाली नाहीत म्हणून झगडतोय.

तिसरीकडे वेगळंच चित्र. बेळगाव सीमेवरला मराठी माणूस झगडतोय, त्याला महाराष्ट्रात थोडीशी जागा मिळावी म्हणून. आपल्या आईच्या पदराखाली रोज शांत झोपता यावं म्हणून त्याची धडपड चालू आहे. त्याची ही चळवळ, त्याची ही धडपड पाहून त्याची कीव ही येते आणि वाईट ही वाटते.

महाराष्ट्रदिनाच्या निमित्ताने हा लेख लिहिताना मनात अनेक भावना आहेत. अभिमान वाटतोय महाराष्ट्रीय असल्याचा. पण वाईट वाटतेय, विदर्भातल्या भावंडांसाठी, बेळगावातल्या बांधवांसाठी. वाईट वाटतंय, मायभूमीसाठी-जिची लेकरं आपसांत भांडत आहेत. कुणी सीमेवरून, कुणी हक्कांसाठी आणि कुणी सत्तेसाठी.

1 comment:

  1. मुळात मला वाटतं हे सत्कार सोहळे आणि 'गर्व असणं'वगैरै हा फारच दांभिकपणा आहे. आपण किती दिवस त्याच त्याच लोकांना मराठी आयकॉन म्हणणार आहोत. मिरवणुका काढणार आहोत. आजही परिस्थिती काय, महाराष्ट्रात लोडशेडिंग होतंय आणि जनरेटर किंवा लाखो वॅट वीज वापरून पक्ष हे सोहळे सादर केले जाताहेत.
    ग्रीकमध्ये जेव्हा राज्यामध्ये महागाई वाढली होती आणि सामान्यांचा विचार करणंच राज्यकर्त्यांनी सोडून दिलं होतं. ते आपल्याच कैफात मश्गूल होते तेव्हा त्यांनी लोकांसाठी सिंह आणि माणूस यांचे खेळ खेळवून त्यांना गुंतवण्यास सुरुवात केली. त्यामुळे लोकं आपल्यावर होणारे अन्याय विसरून तो चित्तथरारक खेळ पाहू लागले... हे आयपीएल, सोहळे तसंच आहे...
    किती दिवस आपण त्या हुतात्म्यांनी असं केलं याची लेक्चरबाजी करणार... त्यांना प्रणाम किंवा वंदन असं म्हणणार...अरे पण त्यांनी मिळवून दिलेल्या महाराष्ट्रात गेल्या 50 वर्षांत काहीच ठोस झालेलं नाही...त्याचं काय असे अनेक प्रश्न मला पडले 1 मेला... ज्यांची उत्तरं मराठीच्या नावे बोंबा मारणा-या कोणाकडेच नाहीत...

    ReplyDelete